दहावी, बारावी परीक्षेसाठी कॉपीविरोधी ७० भरारी पथके

कोल्हापूर / प्रतिनिधी

आगामी दहावी व बारावी परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील कॉपीविरोधी ७० भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्या पन्नास मिटर अंतरावरील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्या ५०० मिटर परिसरात जमाव बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
बारावीची परीक्षा दि. ११ तर दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. बारावीची ७३ तर दहावीची परीक्षा १३८ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी तालुकास्तरावर स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात येणार असून एक पथकामध्ये महिला अधिकाऱ्यांसह चार अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. पथक प्रमुख वर्ग एकचे अधिकारी असणार आहेत. याशिवाय प्रत्येक परीक्षा केंद्रावर दोघांचे बैठे पथक असणार आहे. परीक्षेच्या अगोदर दीड तास हे बैठे पथक केंद्रावर उपस्थित राहून वर्ग खोल्या व परीक्षार्थीची तपासणी करेल. हे करताना परीक्षार्थीना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यातूनही एखादा विद्यार्थी कॉपी करताना सापडला तर केंद्र संचालक व बैठे पथकातील कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी सांगितले.

Scroll to Top