इचलकरंजी / प्रतिनिधी
ऋण वसुली न्यायाधिकरण, पुणे येथे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या समन्वयाने तथा पुणे डी.आर.टी. बार असोसिएशन यांच्या सहकार्याने लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
उपरोक्त लोकन्यायालयामध्ये तडजोडीसाठी एकूण १६१ खटले तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी एकूण १४१ खटले सामोपचाराने मिटविण्यात यश आले. उपरोक्त तडजोडीतून बँकाची एकूण रक्कम रुपये २०२ कोटी रुपयांचे प्रलंबित दावे निकाली निघाले आहेत. या लोक न्यायालयामध्ये अनेक बँका व वित्तीय संस्था यांनी सहभाग घेतला. या लोक न्यायालयामध्ये न्यायाधिशांचे एकूण ३ पॅनेल तयार करण्यात आले होते, त्यामध्ये पॅनेल प्रमुख म्हणून दिलीप मुरुमकर (पिठासीन न्यायाधीश, पुणे ऋण वसुली न्यायाधिकरण तथा निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधिश), तसेच निवृत्त जिल्हा न्यायाधिश एस. जे. काळे व वसुली अधिकारी रविकांत यादव यांनी काम पाहिले तर पॅनेल सभासद म्हणून अॅड. आरती अहुजा, अॅड. योगेश माने आणि अॅड. झिनाल ठकार यांनी काम पाहिले.
तसेच उपरोक्त लोक न्यायालय यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रबंधक अजयकुमार साहु, सुर्यकांत निकम, सतिश पत्मासे तसेच डी.आर. टी. बारचे अध्यक्ष अॅड. एस.एस. त्र्यबंके, अॅड. प्रदिप यादव, अॅड. प्रिती भट, अॅड. जांगडा, अॅड. व्ही. एस. टोकेकर व इतर विधीज्ञ यांचे सहकार्य लाभले.

