16 हजार अबाल-वृध्दांनी दिली परीक्षा

 

कुणीही निरक्षर राहू नये, या उद्देशाने शासनाकडून उल्लास नवभारत साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात रविवारी निरक्षरांची परीक्षा घेण्यात आली. सुमारे 2 हजार 25 केंद्रांवर 16 हजार 560 जणांनी ही परीक्षा दिली. त्यामध्ये अगदी 15 वयाच्या तरुणापासून ते 70 वर्षांच्या आजी-आजोबांचा देखील समावेश होता.

जिल्हा परिषदेचे योजनेचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाच्या माध्यमातून परीक्षेेचे नियोजन करण्यात आले होते. नातवंडे दहावी व बारावीच्या परीक्षेत गुंतलेली असताना चक्क अनेकांच्या आजी-आजोबांनी बँचवर बसून शालेय विद्यार्थ्याप्रमाणे परीक्षा दिली. सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही परीक्षा सुरू होती. असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान आदी बाबींवर ही मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात आली. संबंधित व्यक्ती उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना साक्षर असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वाळवा तालुक्यात सर्वांधिक म्हणजेच 3 हजार 25 निरक्षरांनी परीक्षा दिली.

शिराळा : 1299, कवठेमहांकाळ 1383, कडेगाव 628, मिरज 2725, खानापूर 1029, आटपाडी 1002, जत 2484, तासगाव 1158, पलूस 674, मनपा 1153, अशी एकूण 16 हजार 560 जणांनी परीक्षा दिली.

Scroll to Top