कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या संचमान्यतेस शिक्षण संचालक, पुणे यांनी मान्यता दिली आहे. त्यामध्ये १५ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. यामुळे मुख्याध्यापकांच्या पदोन्नती पंधरा दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्या. या पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची मोठी गर्दी झाली होती.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सोमवारी मुख्याध्यापकपदाच्या पदोन्नती चौथ्या मजल्यावरील सभागृहात ठेवण्यात आल्या होत्या. साधारणपणे ४०० शिक्षकांच्या पदोन्नती करण्यात येणार होत्या. त्यामुळे सकाळपासून शिक्षक जिल्हा परिषदेत येत होते. चौथा मजला संपूर्ण भरला होता.
पाच शिक्षकांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती दिली. दरम्यान, १५ शाळांतील शिक्षक अतिरिक्त ठरविले आहेत. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय पदोन्नती करणे योग्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांच्या पदोन्नती पुढे ढकलल्या. त्यामुळे शिक्षकांना पदोन्नती न घेताच जावे लागले.
