उद्यापासून बारावीची लेखी परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षेला मंगळवार (दि. 11) पासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती कोल्हापूर बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. कोल्हापूर विभागातील 176 केंद्रांवर ही परीक्षा होत आहे.

विभागीय मंडळाकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व साहित्य परीक्षा केंद्रांवर पोहोचले आहे. सातारा जिल्ह्यातून 34 हजार 576, सांगली 32 हजार 830, तर कोल्हापूर जिल्ह्यातील 50 हजार 826, असे सुमारे 1 लाख 18 हजार 232 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. संवेदनशील केंद्र परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे निगराणी केली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर केंद्रांवरील भौतिक सुविधांची खात्री प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांबाहेर व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसाठी तालुका व जिल्हास्तरीय भरारी व बैठी पथके असणार आहेत. गैरप्रकारांना प्रतिबंधासाठी 1982 च्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणार्‍यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रातील 500 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत.

Scroll to Top