आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून 125.86 कोटीचा निधी एक्स्ट्रा हाय व्होल्टेज, हाय व्होल्टेज सब स्टेशनची होणार उभारणी वस्त्रनगरीतील वीजेची कमतरता होणार दूर

इचलकरंजी/प्रतिनिधी

अत्याधुनिकतेची कास धरत असताना वस्त्रनगरी इचलकरंजी शहर व परिसरातील औद्योगिक वसाहतींसाठी अपुरा पडणारा वीज पुरवठा योग्य प्रमाणात आणि नियमित व्हावा यासाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सबस्टेशन, हाय व्होल्टेज सबस्टेशन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 आणि बंच केबल टाकणे आदी कामांसाठी तब्बल 125.86 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. याकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून हायटेक होणार्‍या इचलकरंजी व परिसराची वीजेची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्राचे मँचेस्टर आणि वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेले इचलकरंजी शहर हायटेक बनत चालले आहे. याठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधांसाठीच्या अपेक्षा वाढत चालल्या असून औद्योगिक प्रगती वेगाने होत असताना वीजेची कमतरता भासत आहे. या संदर्भात माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला होता. आता आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी या प्रश्‍नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करुन हा भासणारी विजेची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी शहर व परिसरातील वाढते औद्योगिकरण पाहता सध्या असलेला वीज पुरवठा अपुरा पडत आहे. तर वीजेच्या कमतरतेमुळे नवे उद्योग थांबले असल्याचे सांगत तातडीने वीज पुरवठ्यासाठी आवश्यक ती पूर्तता करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तिळवणी (ता. हातकणंगले) येथे 100 मिलीयन व्होल्टेज अ‍ॅम्प्लीयर (एमव्हीए) चे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज (इव्हीएच) सब स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर शिवनाकवाडी (ता. शिरोळ) याठिकाणीही एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सब स्टेशनसाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून 2026 पर्यंत हे काम मार्गी लागेल.
न्यु सर्व्हिस कनेक्शन स्कीम योजना अंतर्गत शहापूर परिसरातील प्राईड पार्कनजीक 20 एमव्हीएचे 8.86 कोटी खर्चाचे हाय व्होल्टेज सब स्टेशन उभारण्यात येणार असून ते तीन महिन्यात सुरु होईल. सत्यराज टेक्स्टाईल पार्क याठिकाणी 20 एमव्हीएच्या हाय व्होल्टेज सब स्टेशनसाठी 13.52 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून चार महिन्यात हे कामही पूर्ण होईल.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत तारदाळ येथील सन्मती हायस्कूलनजीक 20 एमव्हीए, तिळवणी येथे 20 एमव्हीए, इचलकरंजीतील नाईक मळा (आवाडे सब स्टेशन परिसर) येथे 20 एमव्हीए, शहापूरातील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे 20 एमव्हीए आणि निरामय हॉस्पिटल परिसरात 20 एमव्हीएचे सब स्टेशन होणार असून त्यासाठी 21.12 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी शहापूर व निरामय हॉस्पिटल परिसरातील सब स्टेशन मार्च 2026 पर्यंत तर उर्वरीत सब स्टेशन डिसेंबर 2025 पर्यंत पूर्णत्वास जातील. तर आरडीएसएस योजना अंतर्गत शहरात जवळपास 50 किलोमीटर लांबीची बंच केबल टाकण्याचे काम सुरु झाले असून त्यासाठी 12.36 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. हे काम मे 2025 पर्यंत पूर्ण होईल.
हायटेक बनत चाललेल्या वस्त्रनगरीला भासणारी वीजेची कमतरता या कामांमुळे पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे. केवळ वीज उपलब्ध नसल्याने थांबलेले लहान-मोठे उद्योग आणि व्यवसायांना चालना मिळणार असून वस्त्रनगरीच्या प्रगतीची घोडदौड वेगाने होणार आहे. या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी सांगितले.

Scroll to Top