कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. बारावीचा निकाल १० मेपर्यंत, तर दहावीचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापूर विभागांतर्गत बारावीची परीक्षा १ लाख १७ हजार ३३० विद्यार्थ्यांनी दिली. दहावीच्या परीक्षेला १ लाख ३० हजार ८४४ विद्यार्थी बसले. दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे गुण राज्य शिक्षण मंडळाकडे पाठवले आहेत. तसेच क्रीडासाठी आपले सरकारवर ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम पूर्ण झाले असून, जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडून ६ हजार ५०० अर्ज भरले आहेत. कोल्हापूर क्रीडा विभागातर्फे प्राप्त अर्जाची पडताळणी मंगळवार, दि. २९ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण राज्य मंडळाला पाठवले जाणार आहेत. खेळाडूंना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सहभागासाठी ५ ते २५ गुण दिले जातात. जून महिन्यापूर्वी दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाला तर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन १५ मेपूर्वी दहावी-बारावीचे निकाल राज्य शासनाकडून जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

